जिथ भावं तिथ देवं



देव बाजारचा भाजीपाला नाय रे !देव अशान पावायचा नाय रे! कायम ऐकण्यात येणाऱ्या ओळी , पण बघाना मनुष्य आपल्या स्वार्थासाठी , आपल्या सुखासाठी कितीतरी ठिकाणी त्याला पैशाच्या रूपान तोलतो , त्याचे मोल लावतो !यासाठी दाखला म्हणजे नातवाच्या प्रतिक्षेने एखादी आजी तिला आवडणाऱ्या देवाला नवस बोलते ” देवा मुलाला मुलगा होऊदे तुला चांदीचा पाळणा वाहीन “. सहज उच्चारलेले हे वाक्य कायम आजीच्या मनात घोळत राहते. काही काळाने नातूही होतो परंतु काही कारणास्तव आजीला बोललेला नवस फेडता येत नाही मग चालू होतो भावनांचा खेळ, अकारण भीतीचे सावट ! बाळ जरा आजारी झाल की देवाचा धावा सुरू होतो नवसाची आठवण स्वतःच करून दिली जाते.
” मुलाला नोकरी लागली ना अकरा नारळाच तोरण बांधीन ” व्यवसायात वाढ झाली ना दोन किलो पेढे वाटीनं , मुलीला चांगल स्थळ मिळाल ना तीर्थयात्रा करीनं , मुलाला ९५ % पडलेना अनवाणी देवाला फेऱ्या मारीन ! अशा एक ना अनेक गोष्टीत देवाला निष्कारण गोवून अंधश्रद्धा वाढवली जाते. बोललेल्या गोष्टी करता आल्या नाही की मगं स्वतःबरोबर कुटुंबाचही मनस्वास्थ्य धोक्यात येतं.
ज्या देवान समस्त सृष्टीची उत्पत्ती केली , मनुष्य, चार खाणी चार वाणी चौऱ्यांशी लक्ष योनिंची निर्मिती केली तो अशा नाशिवंत वस्तूंसाठी भक्तांना त्रास देईल का? निर्गुण निराकार जो सृष्टीचा कर्ता करविता आहे अधिकारी आहे तो कधीही कशावर हक्क दाखवत नाही ! परंतु एवढ मात्र नक्की आहे देव हा भावाचा भुकेला आहे. भक्तांच्या सोने, चांदी , पैशावर देवाचे काही अडलेले नाही परंतु देवाविषयीचा भाव मानुसकीचा भाव यावर मात्र देवाचे सतत लक्ष असते. म्हणून तर संतांनी देव हा फक्त मंदिरात मूर्तीत न दाखवता चराचर सृष्टीत आत्मा रूपाने दाखवला. देवाला फक्त दान जेवणावळी याने प्रसन्न करून घेता येत नाही तर यासाठी भूतदया, मानवता धर्म यावर प्रेम करावे लागते. लाखो रूपये खर्च करून देव भेटत नाही तर त्यासाठी अंतरीचा भाव निष्कामतेचा, निर्मळतेचा ठेवायला हवा म्हणून तर सुदाम्याचा भाव श्रीकृष्णाला आवडला त्याने काय आणलयं यावरून देव प्रसन्न झाला नाही तर गरीबीत हालाखीत असतानाही सुदामा श्रीकृष्णाचा अखंड धावा करत राहिला. म्हणूनच मानव देह पुण्यकर्माने सार्थकी लावून आपल्यालाही या देहाची सोन्याची नगरी करून घेता आली पाहिजे !


सौ निता मोहन खराडे (उगले)

Leave a Comment